"भाजपाच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल"; नाना पटोलेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:02 PM2023-03-15T19:02:40+5:302023-03-15T19:04:32+5:30
महाविकास आघाडीची संयक्त बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली.
मुंबई - केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिली आहे. आता पुन्हा तेच काम होणार आहे. भाजपला सत्तेतून हाकलून देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीची संयक्त बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सत्तेत जाण्यासाठी नाही तर देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आहे. राज्यातील सर्व महसुली विभागात महाविकास आघाडीच्या सभा घेण्याचा निर्णय झालेला आहे. मविआच्या या सर्व सभा अतिभव्य झाल्या पाहिजेत. तालुका, जिल्हा पातळीवर सभेची तयारी जोरात करून या सभा यशस्वी करा असे आवाहन पटोले यांनी केले.
यावेळी बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मविआचे सरकार चांगले काम करत असताना ते सरकार पाडले. पण आज राज्यातील परिस्थिती मविआच्या बाजूने आहे. विधान परिषदेच्या निवडणुका मविआने जिंकल्या, कसबा पोटनिवडणुकही मोठा विजय मिळवलेला आहे. मी राज्याचा दौरा करत असताना अनेकदा पाहिले की ग्रामीण भागात भाजपा कुठेही नाही. ग्रामीण भाग हा भाजपाच्या अजेंड्यात नाहीच आता ते प्रयत्न करत आहेत. पण मविआने एकत्र निवडणुका लढवल्या तर लोकसभेला ३८ जागा जिंकू शकतो ही परिस्थिती आहे तसेच विधानसभेला १८० जागा जिंकू शकतो. राज्यातील जनतेला मविआचेच सरकार हवे आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या संघटीत ताकदीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच सत्तेवर येणार हा विश्वास आहे.
आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत येण्यासाठी आदरणीय सोनियाजी गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा पुढाकार होता. अडीच वर्ष मविआ सरकारने उल्लेखनीय काम केले. सरकार आल्याबरोबर कोरोनाचे संकट आले, खूप अडथळे आले पण त्याकाळातही विकासकामे थांबू दिली नाहीत. कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाचे जगाने कौतुक केले. गंगेत प्रेतं वाहून जात असताना महाराष्ट्राने मात्र अशी वाईट अवस्था येऊ दिली नाही. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पहिले काम शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे केले. त्याआधी भाजपा सरकारने दिलेल्या कर्जमाफीसाठी ६५ रकान्याचा फॉर्म रांगेत उभे राहून भरावा लागत होता पण मविआने कसलाही छळ न करता शेतकऱ्याला कर्जमाफी दिली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र असल्याने महाराष्ट्रात एकोप्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना सन्मानाची वागणूक दिली. आम्ही मनापासून एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. महाविकास आघाडीचे सरकार जसे होते तसेच स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी असली पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. सध्या राजकारण ज्या पद्धतीने चालले आहे ते लोकांना पटत नाही.
सध्याचे सरकार शत्रुत्वाची भूमिका घेऊन वागत आहे, हे चित्र बदलायचे असेल तर तिन्ही पक्षाने एकत्र आले पाहिजे, यश मिळवायचे असेल तर आपल्याला तालुका, जिल्हा पातळीवर एकत्र आले पाहिजे ते काम आपल्याला करावयाचे आहे. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, यांनीही बैठकीला संबोधित केले.