"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:06 PM2024-08-26T16:06:20+5:302024-08-26T16:08:46+5:30

मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांसाठी नसून फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी असल्याचाही केला आरोप

Congress Nana Patole slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government | "सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात

"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole on Mahayuti Government: महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशीर्वाद मिळत आहेत. गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत. शाळेतील लहान मुलीही सुरक्षित नाहीत. आणि आता तर कायद्याचे रक्षक असलेले पोलिसही सुरक्षित राहिलेले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरावर दरोडा पडला. दुसरीकडे पुण्यात पोलीस उपनिरिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. राज्य सरकारच्या आशीर्वादानेच गुंडांची हिम्मत वाढली असून पोलिसांवरही हल्ले होत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

"भाजपा युती सरकारने पोलिसांना कमजोर बनवले आहे. या सरकारच्या काळात गुंडांना सरकारी ताकद मिळली आहे. काही गुंड मुख्यमंत्र्यांसोबतच फिरत आहेत तर काहींना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली, काहींना उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये भरती करुन फाईव्हस्टार सेवा पुरवली जात आहे. सरकारचा आशिर्वाद असल्यानेच गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिम्मत करत आहेत. या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही, सरकार बेशरम असून जनतेला वाऱ्यावर सोडून सर्व बाजूंनी लुटण्याचे काम सुरु आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या कार्यक्रमातही खोटे बोलले. महिलांच्या संदर्भातील शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे दोन वर्षांपासून पडून आहे तो मंजूर केला जात नाही आणि गप्पा महिला सुरक्षेच्या मारत आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी योजनांबद्दल बोलले पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला पंतप्रधानांकडे काहीच अर्थ नाही असे दिसले. मुख्यमंत्री शिंदेंनी पुंगी वाजवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जो भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांना अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणतो त्यांना शेतकऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही. लखपती दीदी ही योजनाही फसवी आहे. १ लाख रुपयांचे कर्ज आधीच मिळत होते ते ५ लाख केले पण त्यासाठी भरमसाठ अटी घातल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होणार आहे," असा दावा त्यांनी केला.

Web Title: Congress Nana Patole slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.