उद्धव ठाकरे यांची ‘ती’ खुर्ची जाणार! नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “सर्वांना समान...”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:13 PM2023-04-15T13:13:13+5:302023-04-15T13:14:23+5:30
Nana Patole On MVA Vajramuth Sabha: सर्वच नेते येतील असे नाही. आमचे प्रमुख नेते वज्रमूठ सभेला येतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.
Nana Patole On MVA Vajramuth Sabha: छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा पार पडली. यानंतर आता नागपूरमध्ये वज्रमूठ सभा होत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वेगळी मोठी खुर्ची देण्यात आली होती. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नागपूर येथे होणाऱ्या सभेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची माहिती दिली.
इतर नेत्यांनी जी खुर्ची असेल तीच उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. नागपूरातील वज्रमुठ सभेत सर्वांच्या खुर्च्या सारख्या असतील. उद्धव ठाकरे यांना जी खुर्ची असेल तीच खुर्ची सर्वांना असेल. सभेत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांची भाषणे होणार आहेत. काही लोक कर्नाटकात गेले आहेत. सर्वच नेते येतील असे नाही. आमचे प्रमुख नेते येतील. मला सुरतला जायचे होते म्हणून मी संभाजीनगरच्या सभेला गेलो नव्हतो. उद्याच्या सभेत मी जाणार आहे. नागपुरातील वज्रमुठ सभा जोरात हेणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी फार बोलत नाही
नागपूरच्या विकासबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर बोलताना, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी फार बोलत नाही हे सर्वांना माहिती आहे. नागपूरच्या लोकांना काय अडचणी आहेत, किती कर लावलेय याबाबत संजय राऊत यांनी बोलावे. नागपुरात लुट सूरू आहे, हे संजय राऊत यांनी तपासावे मग विकास कळेल. नागपूर किती महागडे शहर आहे, हे संजय राऊत यांनी आधी पाहावे. तेव्हा कळेल विकास झाला की नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. यावर बोलताना, राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यावर भाजपने विरोध केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ. राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला तर यांची काय हालत होणार हे त्यांनी बघावे, असा दम नाना पटोले यांनी भरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"