काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच; समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:50 AM2018-06-07T00:50:10+5:302018-06-07T00:50:10+5:30
सद्य:स्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
नागपूर : सद्य:स्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तीनदा भेट झाली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची आघाडी होणारच, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
पटेल यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादकीय सहकाºयांशी चर्चेदरम्यान त्यांनी विविध विषयांवर स्पष्ट मते मांडली. सत्तास्थापनेनंतर सुरुवातीची तीन वर्षे महागाई कमी करण्यासाठी भाजपासमोर अतिशय पोषक वातावरण होते. मात्र ते कमी करण्यात अपयशी ठरले. वर्तमान राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांनी भाजपाला थांबविण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नेमके कोण करेल हे सांगणे कठीण आहे. मात्र शरद पवार हे विरोधी पक्षांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतात, असे पटेल म्हणाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात कमी होतील. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा यांसारख्या राज्यांत तर विरोधकांनी एकत्र येणे भाजपासमोर अनेक आव्हाने उभे करणारे राहणार आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.