मोदींकडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार

By admin | Published: October 13, 2014 05:27 AM2014-10-13T05:27:40+5:302014-10-13T05:27:40+5:30

आश्चर्याची बाब म्हणजे इतकी वर्षे आरोप केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज त्याच भ्रष्ट नेत्यांचा प्रचार करीत असल्याचा उपरोधिक टोलाही राज यांनी लगावला.

Congress-NCP campaign by Modi | मोदींकडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार

मोदींकडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार

Next

मुंबई : गेली १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने सडकून टीका केली, त्यांनाच पक्षाची उमेदवारी दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतकी वर्षे आरोप केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज त्याच भ्रष्ट नेत्यांचा प्रचार करीत असल्याचा उपरोधिक टोलाही राज यांनी लगावला.
मुंबईतील गिरगाव, घोडपदेव आणि नंतर लालबागमध्ये जाहीर सभा घेत राज यांनी भाजपासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. या वेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करणे टाळले.
लालबागमध्ये शिवडीतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत राज म्हणाले, की वर्षानुवर्षे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष रस्ते, वीज, पाणी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर मते मागत आहेत. मात्र राज्याच्या विकासाची योजना एकाही पक्षाकडे नाही, मनसेकडे ती आहे. त्यासाठी केवळ एकदा बहुमत द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
सत्ता आल्यास राज्यात अनेक उद्योग आणण्याची हमी त्यांनी या वेळी दिली. ते म्हणाले, की प्रत्येक उद्योगात मराठी मुलामुलींनाच रोजगार देण्याची अट प्रत्येक उद्योजकाला घातली जाईल. मराठी माणसांसाठी राज्यात आणि मुंबईत परवडणारी घरे बांधण्याची योजना मनसे राबवून दाखवेल. महिलांच्या सुरक्षेसह ‘राइट टू पी’ या महिलांच्या मुताऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
राष्ट्रवादीची खरडपट्टी
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर राज यांनी तोंडसुख घेतले. बेताल वक्तव्य करण्यात राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे सांगत त्यांनी माजी उपमख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा पाढा वाचला.
उमेदवारीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्यांना राज यांनी शिवडीतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा दाखला दिला. पक्षाच्या प्रचाराची धुरा एकट्या राज यांच्यावर असल्याचे पाहून शिवडीतील उमेदवारी दुसऱ्या उमेदवारास देण्यास नांदगावकर तयार झाल्याचे राज यांनी सांगितले. नांदगावकर यांची पक्षनिष्ठा इतर नेत्यांनी आत्मसात करण्याचा सल्लाही दिला.(प्रतिनिधी)

Web Title: Congress-NCP campaign by Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.