काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली!

By admin | Published: November 3, 2016 05:08 AM2016-11-03T05:08:00+5:302016-11-03T05:08:00+5:30

सांगली-सातारा, पुणे, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला निवडणूक

Congress-NCP jumpy! | काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली!

काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली!

Next


मुंबई : सांगली-सातारा, पुणे, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला निवडणूक होत असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही काँग्रेसने एकमेकांपासून फारकत घेत स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. उमेदवारी अर्ज शनिवारपर्यंत मागे घेता येणार आहेत, त्यामुळे पडद्याआड अजूनही एकमेकांशी वाटाघाटी सुरुच आहेत.
सध्या चार जागी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर प्रत्येकी एक जागा भाजपा आणि काँग्रेसकडे आहे. मात्र आघाडी करायची असेल तर दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी ३ जागा लढवाव्यात, असा आग्रह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धरला होता. आहे तशाच जागांचे वाटप झाले तर राष्ट्रवादीची आणि भाजपाची छुपी युती उघड होणार नाही, त्यामुळे एकतर राष्ट्रवादीने तीन-तीन जागांवर होकार द्यावा किंवा भाजपाशी लढाई करावी, असा छुपा डाव त्यामागे पृथ्वीराज चव्हाण गटाचा आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडी करण्याच्या तयारीत होते.
पुण्यातून राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे आमदार अनिल भोसले, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक अशोक येनपूरे, शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (माऊली) खंडागळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेवक राजेंद्र वागसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आमदार विलास लांडे, काँगे्रसचे गोपाळ तिवारी यांच्यासह चौघांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
नांदेडमधून काँग्रेसकडून विद्यमान आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह इतर तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये माजी सनदी अधिकारी व अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक श्यामसुंदर शिंदे, संदीप निखाते, गजानन पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत.
भंडारा-गोंदियासाठी काँग्रेसतर्फे विद्यामान आ. गोपाळदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र हिरालाल जैन, भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले डॉ. परिणय रमेश फुके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यवतमाळमधून शिवसेना-भाजपा युतीने सोलापूरहून उमेदवार आणून माढाचे उद्योजक तानाजी सावंत यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फे पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष शंकर बडे, तर राष्ट्रवादीने विद्यमान आ. संदीप बाजोरिया यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दिला आहे.
सांगली-सातारा जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे बुधवारी शेखर गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. एकूण आठ उमेदवारांचे १३ अर्ज दाखल झाले आहेत. गोरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी
मात्र माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गैरहजर राहिले. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेसुद्धा गैरहजर राहिले. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीवरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. काँग्रेसतर्फे आता येथून पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनीही अर्ज भरला असून काँग्रेसमधून
बंडखोरी करत शेखर माने यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपातर्फे
माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांनी अर्ज भरला. (विशेष प्रतिनिधी)
>खडसे समर्थकाला डावलले
जळगावमधून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपातर्फे चंदूलाल विश्राम पटेल, काँग्रेसतर्फे लता छाजेड, शिवसेनेतर्फे सुरेश चौधरी यांचे अर्ज आले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक विद्यमान आ. डॉ. गुरुमुख जगवाणी यांचे तिकीट भाजपाने कापले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
>आम्ही आघाडीच्या मताचे
काँग्रेसच्या ठरावीक नेत्यांच्या हट्टामुळे आघाडी झालेली नाही. अजूनही आम्ही आशावादी आहोत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत जुन्या फॉर्म्युल्याप्रमाणे कॉँग्रेसने आघाडी करावी. समविचारी पक्षांनी एकत्रित राहावे, या मताचे आम्ही आहोत.
- जयंत पाटील, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Congress-NCP jumpy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.