शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी
By admin | Published: June 10, 2017 04:00 PM2017-06-10T16:00:27+5:302017-06-10T16:00:27+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 10- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारने तोडगा काढूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रश्नांवर राजकारण खेळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने भाजपा प्रवक्ते विविध शहरांमध्ये विकासकामांची माहिती देत आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंपरीत प्रवकत्या शायना एन सी आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्याची महिती दिली.
शेतकऱ्यांना अनुदान देणं, शेतीमालाला भाववाढ हे तात्पुरते उपाय आहेत. अशीच आश्वासनं आधीच्या सरकारनेसुद्धा दिली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भाजपा अडीच वर्षांपासून काम करतं आहे, असंही पत्रकार परिषदे दरम्यान शायना एन सी म्हणाल्या आहेत.
भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छेदिन
भाजपाच्या आधी जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली. भाजपा सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमी भाव दिल्याचं दिसून येतं आहे. मागील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक तूर भाजपाच्या काळात खरेदी केली. खऱ्या अर्थाने भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात युरिया खत शेतकऱ्यांना काळ्या बाजाराने घ्यावे लागत होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे. शेतकऱ्यांच्या कृती समितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे जे लोक आहेत, त्यांच्यातच मतभेद असल्याने चर्चा होत नाही. ही शोकांतिका आहे. असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नमूद केलं.