काँग्रेस-राष्ट्रवादीत बहिष्कारावरून फूट
By admin | Published: December 15, 2014 03:44 AM2014-12-15T03:44:18+5:302014-12-15T03:44:18+5:30
आमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे.
कमलेश वानखेडे, नागपूर
आमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे. सोमवारी विधानसभेच्या कामकाजात भाग न घेता पायऱ्यांवर बसून सरकारचा ‘बीपी’ वाढविण्याचा बेत राष्ट्रवादीने आखला असताना काँग्रेसने मात्र सभागृहात बसून गारपीट व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष अधिवेशनात राज्यपालांची अवमानना केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. तर हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या वेळी निलंबनाचे घाव सोसणाऱ्या काँग्रेसनेही राष्ट्रवादीला साथ दिली व सभात्याग केला. सोमवारी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सरकारवर दबाव निर्माण करायचा व आपल्या आमदारांचे निलंबन रद्द करून घ्यायचे, अशी रणनीती विरोधकांनी आखली होती. मात्र, काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे आता या मुद्यावर राष्ट्रवादी एकटी पडली आहे. काँग्रेसचे पाच सदस्य निलंबित करण्यात आले तेव्हा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा एक सदस्य निलंबित झाले म्हणून राष्ट्रवादी घेईल तीच भूमिका काँग्रेसने कशासाठी घ्यावी, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. तर, सरकारचा कारभार एकतर्फी सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.