जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र येणार

By admin | Published: February 24, 2017 08:44 PM2017-02-24T20:44:37+5:302017-02-24T22:13:28+5:30

राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

Congress-NCP will come together in Zilla Parishads | जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र येणार

जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र येणार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी गांधी भवन येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. २५ पैकी बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेतील त्रिशंकू परिस्थितीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजप मित्रपक्ष असून, केंद्रात व राज्यात ते एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना व भाजपकडे बहुमताइतके संख्याबळ आहे. त्यामुळे मुंबई मनपात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करायची की नाही, हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. या संदर्भात काँग्रेसची भूमिका त्रयस्थाची असून, काँग्रेस या परिस्थितीकडे ‘वेट अँड वॉच’नुसार केवळ‘वॉच’ करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अशोक चव्हाणांसह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे,विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम,माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस आदी नेते यावेळी उपस्थित होते.

Web Title: Congress-NCP will come together in Zilla Parishads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.