काँग्रेस, राष्ट्रवादीची ठाण्यात आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 12:24 AM2017-01-22T00:24:11+5:302017-01-22T00:24:11+5:30
शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी ठाण्यात अजून सुरूच झाल्या नसताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याची माहिती काँग्रेस नेते आ. नारायण राणे यांनी दिली.
ठाणे : शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी ठाण्यात अजून सुरूच झाल्या नसताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याची माहिती काँग्रेस नेते आ. नारायण राणे यांनी दिली. दोन्ही पक्षांचे जागावाटप उभय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या अनुमतीने जाहीर केले जाणार आहे.
राणे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदेही हजर होते. जागा वाटपावर सखोल चर्चा केल्यावर आघाडीचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ते म्हणाले की, आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे १०० टक्के एकमत झाले आहे. सध्या काँग्रेसचे सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ नगरसेवक असून त्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे जागा वाटप केले जाईल.
कुठली जागा कुणी लढवायची, याबाबत वाद नाहीत. कुणी कोणत्या जागा लढवायच्या, याची यादी तयार आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनंतर यादी लवकरच जाहीर केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा ६०-४० जागांचा फॉर्म्युला आहे, तर काँग्रेसचा आग्रह ५५-४५ जागांसाठी आहे. कळवा-मुंब्रा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तेथील जागांवरून आघाडीच्या वाटाघाटींमध्ये गतिरोध निर्माण झाला होता. राणे यांच्या मध्यस्थीनंतर तो निवळला. (विशेष प्रतिनिधी)