काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित तयारी
By admin | Published: May 12, 2014 02:48 AM2014-05-12T02:48:14+5:302014-05-12T02:48:14+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत आढावा बैठकीनंतर रविवारी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करतानाच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी एकत्रितपणे तयारी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण, केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे बैठकीस उपस्थित होते. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक असून आघाडीतील दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे तयारी करण्यावर बैठकीत एकमत झाल्याचे समजते. त्यादृष्टीने राज्यासमोरील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. आचारसंहितेची आडकाठी येण्यापूर्वी मराठा आरक्षण, टोल, एलबीटी या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागा एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)