काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी मुंबईत आघाडी
By admin | Published: April 28, 2015 01:39 AM2015-04-28T01:39:46+5:302015-04-28T01:39:46+5:30
नवी मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसला उपमहापौरपद व समित्यांवर प्रतिनिधीत्व दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची निवड सभा तटकरे यांच्या उपस्थितीत झाली. पक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून प्रत्येक जिल्ह्यातून प्रदेश प्रतिनिधीपदाकरिता नावे प्राप्त झाली आहेत. ज्या जिल्ह्यांत प्रतिनिधींच्या भरायच्या संख्येपेक्षा जास्त नावांची शिफारस केलेली आहे तेथे नावे मागे घेण्यास सांगण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश लाभले. मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याने काँग्रेसची मदत घेण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्यांनीही नवी मुंबईत राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ केला असल्याचे तटकरे यांनी सांगितले. स्थानिक काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीबरोबर जाण्यास विरोध असल्याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले की, स्थानिक काँग्रेस नेत्यांची आघाडीबाबत काय भावना आहे ते आपल्याला माहित नाही.
परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपली आघाडी करण्याची विनंती मान्य केली आहे. स्थानिक अपक्ष नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असल्याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले. निकाल लागल्यावर लागलीच पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी अपक्षांना सोबत येण्याचे आवाहन केले होते, असे ते
म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)