काँग्रेस-राष्ट्रवादीची स्टेट बँकेवर धडक

By admin | Published: March 17, 2017 01:13 AM2017-03-17T01:13:40+5:302017-03-17T01:13:40+5:30

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेले विधान शेतकऱ्यांचा अवमान आणि कायदेमंडळाच्या अधिकारांचा भंग करणारे आहे

Congress-NCP's strike on State Bank | काँग्रेस-राष्ट्रवादीची स्टेट बँकेवर धडक

काँग्रेस-राष्ट्रवादीची स्टेट बँकेवर धडक

Next

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेले विधान शेतकऱ्यांचा अवमान आणि कायदेमंडळाच्या अधिकारांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांनी
तत्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी; अन्यथा विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास विरोध दर्शवित अशा कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड न करण्याची सवय लागते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गुरुवारी बँकेच्या मुख्यालयावर
धडक दिली. विधान भवनातून निघालेल्या या मोर्चामध्ये अनेक आमदार सहभागी झाले होते. विरोधी पक्षांचे आमदार मुख्यालयात पोहोचले तेव्हा बँकेच्या अध्यक्षा उपस्थित नव्हत्या.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. अरुंधती देशाच्या किंवा राज्याच्या ‘पॉलिसी मेकर’ नाहीत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा अधिकार कायदेमंडळाचा आहे. या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी केला आहे. त्या केवळ एक लोकसेवक आहेत. त्यांनी लोकसेवकच राहावे. शेतकऱ्यांच्या मालक होण्याचा प्रयत्न करू नये, असाही इशारा विखे पाटील यांनी दिला.
देशाची आर्थिक शिस्त कायम ठेवण्याबाबत अरुंधती भट्टाचार्यांनी केलेल्या सूचनांचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात कर्जमाफी करण्याची घोषणा केली, तेव्हा स्टेट बँकेच्या अध्यक्षा गप्प बसल्या. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आर्थिक शिस्त का आठवली, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला.
शेतकरी कर्जमाफीच्या वेळीच आर्थिक शिस्तीचा बागुलबुवा उभा करू पाहणाऱ्या याच अरुंधती भट्टाचार्यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्जबुडव्या विजय मल्ल्यासह असंख्य धनदांडग्या उद्योगपतींची सुमारे १ लाख ४० हजार कोटींची कर्जे ‘राइट आॅफ’ केली आहेत, याकडेही विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Congress-NCP's strike on State Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.