“छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच”; शरद पवार भेटीनंतर काँग्रेस नेत्याचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:59 PM2024-07-16T15:59:37+5:302024-07-16T15:59:41+5:30
Congress Nitin Raut News: आरक्षणाच्या मुद्द्यासह आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Congress Nitin Raut News: ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बारामतील येथील सभेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान गाठून प्रदीर्घ चर्चा केली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, काँग्रेस नेत्याने मोठे विधान केले आहे.
छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट अचानक झालेली नाही. तर त्यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बारामतीत भुजबळांनी शरद पवारांबद्दल जे काही वेडे वाकडे बोलले हे एक कारण होते. ज्या शरद पवारांनी आपल्याला राजकारणात संधी दिली, त्या शरद पवारांबद्दल आपण असे बोललो याची खंत भुजबळांना वाटली असावी आणि त्याच पश्चातापातून भुजबळ शरद पवारांना भेटले असावे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच
छगन भुजबळांची अचानक शरद पवारांशी झालेल्या भेटीमागील दुसरे कारण म्हणजे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी भेट असावी. येणाऱ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही ही भेट महत्त्वाची आहे. या भेटीतून काही नवीन राजकीय दिशा निघते का आणि भुजबळ भविष्यात कोणत्या मार्गाने जातील, याबद्दल भुजबळच सांगू शकतील. मात्र, गेले दोन अधिवेशन भुजबळ अस्वस्थ दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव दिसतो. छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी त्यांचा मन:पूर्वक स्वागतच करेल, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर जाहीर भूमिका घेण्यास बाध्य करण्याची खेळी महायुतीने आखली असल्याचे स्पष्ट संकेत मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीने दिले आहेत. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर शरद पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी, हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.