नगर जिल्ह्यात कॉँग्रेस नंबर वन, झेडपी त्रिशंकू
By admin | Published: February 24, 2017 04:40 AM2017-02-24T04:40:30+5:302017-02-24T04:40:30+5:30
नगर जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने सर्वाधिक २३ तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या आहेत
अहमदनगर : नगर जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने सर्वाधिक २३ तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या आहेत. दोन्ही कॉंग्रेस आघाडी करुन बहुमताचा ३७ हा जादुई आकडा गाठू शकतात. मात्र वेगळी राजकीय समीकरणे साकारल्यास सत्तेचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत एकूण ७३ गट आहेत. यापैकी ७२ गटांची निवडणूक झाली. गतवेळी राष्ट्रवादीला ३२, तर कॉंग्रेसला २८ जागा होत्या. या दोन्ही पक्षांची घसरण झाली. भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे यांनी ‘मिशन फोर्टी’चा नारा दिला होता. मात्र, त्यांना १४ जागांवर थांबावे लागले. गतवेळी सेना-भाजपला प्रत्येकी सहा जागा होत्या.
भाकपला एक तर अन्य आघाड्या व अपक्षांना ९ जागा मिळाल्या आहेत. त्यात नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या आघाडीच्या पाच जागांचा समावेश आहे. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडली. शिवाजी कर्डिले, स्रेहलता कोल्हे या भाजपा आमदारांना जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कॉंग्रेस आघाडीच्या सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यांच्या पत्नीच अध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जातात. मात्र, थोरात-गडाख व राष्ट्रवादी काय भूमिका घेणार? यावर गणिते ठरतील. १४ पैकी प्रत्येकी तीन पंचायत समित्या भाजपा- राष्ट्रवादीकडे, प्रत्येकी दोन काँगे्रस-सेनेकडे, दोन त्रिशंकू, तर एक गडाखांच्या आघाडीकडे गेली. मधुकर पिचडांना पंचायत समिती गमवावी लागली.
अहमदनगर
पक्षजागा
भाजपा१४
शिवसेना०७
काँग्रेस२३
राष्ट्रवादी१८
इतर१०