काँग्रेसनेच बाहेर काढला मोदींहून जास्त काळा पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:32 AM2017-11-08T05:32:07+5:302017-11-08T05:34:36+5:30
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या तीन वर्षांत जेवढा काळा पैसा शोधून जप्त केला गेला त्याहून कितीतरी जास्त काळा पैसा काँग्रेस सरकारने त्याआधीच्या एकाच वर्षात बाहेर काढला होता
मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या तीन वर्षांत जेवढा काळा पैसा शोधून जप्त केला गेला त्याहून कितीतरी जास्त काळा पैसा काँग्रेस सरकारने त्याआधीच्या एकाच वर्षात बाहेर काढला होता, असा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या दाव्याच्या पुष्ठयर्थ आकडेवारीही दिली. यावरून नोटाबंदीचा निर्णय अविचारी होता व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्याची गरज नव्हती, असे ते म्हणाले.
काँग्रेसने दिलेली काळ््या पैशाची वर्षनिहाय आकडेवारी अशी: सन २०१३-१४ : १ लाख १ हजार १८३ कोटी रु. सन २०१४-१५: २३ हजार २१८ कोटी रु. सन २०१५-१६ : २० हजार ७२१ कोटी रु. आणि सन २०१६-१७ : २९ हजार २११ कोटी रु.
देशाच्या विकासाला खीळ घालून अर्थव्यवस्थेला खीळ घालणारा हा अविचारी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी काँग्रेसची मागणी असून त्यासाठी ८ नोव्हेंबर हा नोटाबंदीचा वर्षपूर्तीदिन पक्षातर्फे ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे.
नोटाबंदीच्या त्रासामुळे मृत्यू पावलेल्या देशवासियांना यावेळी राज्यात ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येईल, असेही चव्हाण म्हणाले.
याला जबाबदार कोण?
काँग्रेस पक्षाला मोदींकडून ज्याबद्दल माफी हवी आहे
त्यातील काही प्रमुख मुद्दे असे
बँकांबाहेरच्या रांगांमध्ये झालेले १५० मृत्यू
मध्यम, लघुउद्योगांमधील ३.७२ कोटी लोकांची बेरोजगारी
लाखोंची आयुष्यभराची कमाई बुडणे
अर्थव्यवस्थेचे तीन लाख कोटींचे नुकसान
विकासदराची ९.२ वरून ५.७ टक्क्यांवर घसरण
शेतकºयांचे नुकसान
राज्यातील यंत्रमाग उद्योगावर संकट