नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 04:27 PM2022-06-30T16:27:18+5:302022-06-30T16:27:53+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आमदारांविषयी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही यावर भाष्य केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी रोखठोक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. याशिवाय काही काँग्रेस नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असा मोठा दावाही केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी केलेल्या बंडखोरीमुळे हा मुद्दा बाजूला राहिला. यावर बोलताना, पक्षातील काही स्लीपर सेल झाकले गेले, असे म्हणता येणार नाही. मात्र, नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसमधील काही जणांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन ते सात काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केले आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली तर काँग्रेसमधूनही आमदार जाऊ शकतात, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती
उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसेच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केले हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आले असते. एक-दोन तास सभागृह चालले असते आणि नंतर निर्णय घेतला असता तर चालले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही
आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही. रक्तपात होईल वैगेरे असे जे काही ते म्हणाले ते खोटे होते. त्यांनी लढायला हवे होते. ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवे होते. फेसबुक लाइव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे
इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे नाराज आहेत. याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाहीत. माझ्या इतक्या माणसांनी दगा दिला असे ते सारखे म्हणत राहिले. खाली काय सुरु होते याचा त्यांना अंदाज आला नाही. हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे. भाजपाला थांबवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय दिला असता तर आम्ही मान्य केला असता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर राग काढला तोही काही खरा नव्हता. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले तसेच यावेळी घडेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अवघड जाईल अशी भूमिका घेतली होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.