“मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:53 PM2023-12-11T15:53:19+5:302023-12-11T15:55:46+5:30
Winter Session Maharashtra 2023: केंद्र सरकार राज्याचे ऐकायला तयार नाही. कांदा निर्यातबंदीचा निर्दयी निर्णय घेतला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
Winter Session Maharashtra 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवर आणलेले निर्बंध, शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी आक्रमक होत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात केंद्र सरकावर टीका केली आहे.
दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने बळीराजाला कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळी तालुक्यांप्रमाणे १ हजार २१ महसूली मंडळांना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, वीज बील माफ करावे, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, पिकविम्याची मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान विधानसभेत केली. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी प्रश्नावर प्रतिक्रिया देताना केंद्रावर सडकून टीका केली.
मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही
केंद्र सरकार राज्याचे ऐकायला तयार नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्दयी निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी कांदा उत्पादकांच्या मागे उभे राहायला हवे. देवेंद्र फडणवीस केंद्रात कुणाला तरी भेटतात. अजित पवार एक सांगतात. बळीराजाच्या जीवाचे काही झाले तरी चालेल, यांना काही फरक पडत नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, आस्मानी संकटाबरोबरच तुमच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. तरी तुम्ही उजळ माथ्याने राज्यात फिरताय. उरली सुरली थोडी शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर करा. शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागला. शेतकरी आत्महत्येचे पाप तुमच्या माथी आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.