“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:58 PM2024-05-30T14:58:38+5:302024-05-30T14:59:22+5:30
Prithviraj Chavan News: पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
Prithviraj Chavan News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या एका विधानावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
जगाला महात्मा गांधी यांच्याविषयी सिनेमाच्या माध्यमातून माहिती मिळाली. १९८२ मध्ये रिचर्ड एटनबरो यांनी 'गांधी' हा सिनेमा बनवला. त्यानंतर जगभरातील लोकांना महत्मा गांधींविषयी माहिती मिळाली. तोपर्यंत जगाला गांधींबाबत जास्त माहिती नव्हते. महात्मा गांधी जगातील महान आत्मा होते. या ७५ वर्षात गांधीजींबद्दल जगाला माहिती देण्याची जबाबदारी आपली नव्हती का, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली. तसेच जर जग मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि अन्य नेत्यांबाबत जाणते. पण गांधीजी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. तुम्हाला हे स्वीकारावे लागेल. जगभरात फिरल्यानंतर हे सांगत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला.
PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव
पंतप्रधान मोदी यांचे काय वाटेल ते बोलणे सुरु आहे . त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही. त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले. तसेच महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेत. भ्रष्टाचार करून हे सरकार सत्तेत आले आहे. श्रीमंत लोकांसाठी वेगळा कायदा सुरु आहे पण जनता आता स्वतः न्याय देईल. हे सरकार जनता उलथावून टाकेल, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, महात्मा गांधी हे सूर्य आहेत. ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यांना कोणत्याही ‘शाखा शिक्षित’ प्रमाणपत्राची गरज नाही. शाखांमध्ये ज्यांचा जागतिक दृष्टीकोन बनतो, ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेला समजतात. ते गोडसेंच्या रस्त्याने चालतात. गांधीजी संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाइन या सर्वांनी गांधींपासून प्रेरणा घेतली. हिंदुस्तानातील कोट्यवधी लोक गांधींजींच्या मार्गावर चालतात. अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालतात. लढाई सत्य आणि असत्यामध्ये आहे. हिंसा आणि अहिंसेमध्ये लढाई आहे, असा पलटवार राहुल गांधी यांनी सोशल मिडिया पोस्टमधून केला.