काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:27 AM2024-11-19T05:27:54+5:302024-11-19T05:29:02+5:30

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Congress promises only for elections; Devendra Fadnavis' counterattack on soybean price | काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

आर्वी : काँग्रेसद्वारे शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासन देण्यात येत आहेत. सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ, असे सांगितले जात आहे. सोयाबीनला काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ ३,८०० रुपये भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. काँग्रेस ७ हजाराचा भाव आपल्याच राज्यांत देऊ शकत नसेल, तर महाराष्ट्रात कसा देणार, असा रोखठोक सवाल करतानाच काँग्रेसची आश्वासनेही फक्त निवडणुकीपुरती येतात, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी 
येथे केला.

शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सरकारद्वारे प्रयत्न केले जात आहे. मोफत वीज, नमो सन्मान योजना, वीज बिल माफी, महिलांकरिता लाडकी बहीण योजना, वर्षभर शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याकरिता सौरकृषी पंप योजना, कापूस व सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी झाल्यास भावांतर योजनेंतर्गत मदत, अशा अनेक योजना राबविल्या जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आर्वी येथील गांधी चौकात महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचन सोयी उपलब्ध व्हाव्या, याकरिता नदीजोड प्रकल्प सुरू करून ओलिताची सोय करून देण्यात येणार आहे. महिलांकरिता लखपती दीदी, लाडली बहीण, एसटीमध्ये अर्धे तिकीट, शिक्षणाची सुविधा, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांचा विकास साधला आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

कमी बोलणे व जास्त काम करणारे नेतृत्व

सुमित वानखेडे हे कमी बोलणे व जास्त काम करणे या स्वभावाचे असून, कोणतेही काम हाती घेतल्यानंतर जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत ते स्वस्थ बसत नसल्यामुळे असा जनसामान्याचा नेता असल्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अफवांना बळी न पडता मतदान करा

फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना मोठा निधी आर्वी मतदारसंघाच्या विकासासाठी दिला. आर्वी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकास व प्रकल्प गतिमान करण्याकरता कोणत्याही अफवेला बळी न पडला सुमित वानखेडे यांना सहकार्य करा, असे आमदार दादाराव केचे म्हणाले. 

घराणेशाही रोखा : सुमित वानखेडे

खासदार अमर काळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुमित वानखेडे म्हणाले की, आतापर्यंत आपल्याला निष्क्रिय खासदार समजत होतो. पण, आपण ड्रामेबाजही आहे, हे कालच्या सभेतून कळले. लोकशाही वाचविण्याकरिता घराणेशाहीला रोखा, असे आवाहन वानखेडे यांनी केले.

Web Title: Congress promises only for elections; Devendra Fadnavis' counterattack on soybean price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.