काँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध
By Admin | Published: June 9, 2017 03:20 AM2017-06-09T03:20:12+5:302017-06-09T03:20:12+5:30
मध्य प्रदेश सीमेजवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन १५१ कलमानुसार केलेल्या अटकाव कारवाईचे पडसाद ठाण्यात उमटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पीडित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्य प्रदेश सीमेजवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन १५१ कलमानुसार केलेल्या अटकाव कारवाईचे पडसाद ठाण्यात उमटले. गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या तलावपाळीच्या सिग्नलजवळ धरणे निदर्शने केली.
शहर काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष मनोज शिंदे आणि माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोड, तलावपाळी सिग्नलवर जोरदार निदर्शने करण्यात आली. मात्र, या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करून मोदी सरकारची दहशतवादी कारवाई देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही. जोपर्यंत पीडित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांना सोडण्यात येत नाही, तोपर्यंत काँग्रेसची आंदोलने सुरूच राहतील, असा इशारा काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी दिला. भररस्त्यात काँग्रेसने केलेल्या आंदोलनाने ठाणे स्टेशन रोडवर वाहतूककोंडी झाली होती.