काँग्रेसची २८८ जागा लढण्याची तयारी
By admin | Published: August 14, 2014 01:49 AM2014-08-14T01:49:40+5:302014-08-14T01:49:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्माला जागणार नसेल तर राज्यात विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी आहे,
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्माला जागणार नसेल तर राज्यात विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी आहे, असा सज्जड इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. काँग्रेसच्या २८८ उमेदवारांची यादी आपल्याकडे तयार आहे, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि काँग्रेसचे सर्व मंत्री हे टिळक भवनात झालेल्या या बैठकीला उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत आम्हाला १४४ जागाच हव्यात असा दबाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणला जात आहे. ही मागणी मान्य असेल तर आम्हाला फोन करा असे त्यांचे बोलणे कुठल्या आघाडी धर्माला धरून आहे, असा खडा सवाल या बैठकीत करण्यात आला.
विधान परिषद पोटनिवडणुकीतील जागा काँग्रेसच्या हक्काची असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता अर्ज भरला. विदर्भात अलिकडे झालेल्या काही नगराध्यक्षांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने काँग्रेसला धोका दिला. विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांची उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत मागे घेऊ नका, असे ठाम मत व्यक्त करण्यात आले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील तेव्हा त्यांनी तटकरेंची उमेदवारी मागे घेण्याचा मुद्दा जोरकसपणे रेटावा, असेही काँग्रेसच्या बैठकीत ठरले.
शरद पवार यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या निवडक नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी तटकरे यांची उमेदवारी कायम राहील, अशी भूमिका घेण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)