“आमची लढाई स्वार्थासाठी नाही, काँग्रेससाठी आहे, सांगलीत...”; विशाल पाटील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 06:51 PM2024-04-22T18:51:09+5:302024-04-22T18:51:38+5:30
Vishal Patil News: उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेकांचे फोन आले. वेगवेगळ्या पदांची ऑफर देण्यात आली, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.
Vishal Patil News: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेतेली नाही. त्यामुळे सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने काही कारवाई केली तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. ही लढाई स्वार्थासाठी नाही, तर काँग्रेस पक्षासाठी आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना अर्ज मागे न घेण्याबाबतची भूमिका विशाल पाटील यांनी सविस्तरपणे सांगितली. माझा उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अनेकांचे फोन आले. वेगवेगळी पदे देण्यासाठी ऑफर देण्यात आली. मला पदे नको होती. माझी उमेदवारी जनतेची आहे. सांगलीमधील काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता माझ्या मागे उभा आहे. आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपाचा पाडाव आम्हीच करू शकतो
भाजपचा पाडाव आम्हीच करू शकतो. आमची लढाई ही स्वार्थासाठी नसून काँग्रेस पक्षासाठीच आहे. या काँग्रेस पक्षाच्या विचारांचाच खासदार सांगलीमध्ये निवडून येईल. सांगलीमध्ये तिरंगी लढत होत नसून, ही लढाई फक्त विशाल पाटील आणि दंडूकेशाही करणाऱ्या संजयकाका पाटलांच्या विरोधातच होणार आहे, असा एल्गार विशाल पाटील यांनी केला. विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळाले आहे. काँग्रेसचे चिन्ह हद्दपार करण्याचे काम काहींनी केले. काँग्रेस पक्षाचा विचाराचा खासदार लिफाफा चिन्हावर निवडून देतील आणि सांगलीचा खासदार सांगलीकरच ठरवतील, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जाहीर सभेमध्येच अर्ज माघार घ्यायचा नाही, असा निर्धार केला होता. माघार घेणार नव्हतो. काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल, अशी अपेक्षा होती. शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आला नाही, याचे दुःख झाले. मला अपेक्षा होती की मविआचा अधिकृत उमेदवार मीच होईन, असे विशाल पाटील म्हणाले. काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून सातत्याने विशाल पाटील यांची मनधरणी सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांकडून आमदार विश्वजित कदम यांच्यामार्फत मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. विशाल पाटील यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि माघार न घेता अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला.