हाथरस पीडितेच्या कुटुंबासाठी काँग्रेसचा सत्याग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:54 AM2020-10-06T02:54:43+5:302020-10-06T02:54:53+5:30
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन केले. सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात भाग घेतला.
मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकार कोणालाही तरी वाचवण्याचा आटापीटा करत आहे. सरकारची भूमिकाच संशास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन केले. सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात भाग घेतला. मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले असून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणाची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी करावी अशी मागणी थोरात यांनी केली.