काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:55 PM2024-09-20T12:55:10+5:302024-09-20T12:59:33+5:30
जागा वाटपासाठी तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक सुरु असून संजय राऊतांच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड घासाघीस सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यात मविआला सत्तेत येण्याचे वेध लागले आहेत. लोकसभेला मुसंडी मारल्याने जागावाटपासह मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून रस्सीखेच सुरु आहे. जागा वाटपासाठी तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक सुरु असून संजय राऊतांच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड घासाघीस सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत.
तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते असे सांगत काँग्रेसच्या लोकसभेतील जागा आमच्यामुळे वाढल्या आहेत. कोल्हापूरची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली. रामटेक, अमरावतीची जागा त्यांना आम्ही दिली. हे जर ते विसरत असतील तर ते योग्य नाही. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील. आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. तीनही पक्षांना एकत्र राहावं लागेल त्यासाठी ते एकटे राहणार नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसवर कटाक्ष टाकला आहे.
महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास वाढणार नाही. जर तो आत्मविश्वास वाढला तर अभ्यासाचा विषय आहे. लोकसभेचे जागावाटप सोपे होते. तेव्हा ४८ जागा होत्या आता २८८ आहेत. महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत. परंतु कुठला गोंधळ नाहीय, असे राऊतांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे मत कमी करण्यासाठी काही नवीन आघाडी उभी केली जाते आहे. पैशाचा वापर केला जातोय पदांचा वापर केला जातो असं मला वाटत, असेही राऊत म्हणाले.
मोदी येतात मोदी जातात आपण कसले उद्घाटन केले हे त्यांना माहीत नसते. मोदींनी इथे येऊन उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे बाहेर जातात ते थांबविण्यासाठी निर्णय घ्यावेत. आपटे आणि कोतवाल यांना एकनाथ शिंदे यांचे संरक्षण आहे. या संस्था त्यांचे चिरंजीव खासदार असलेल्या मतदारसंघात आहेत. या लोकांचे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांशी अतिशय कनिष्ठ आहेत. त्यांना वाचविण्याचे काम शिंदेंनी केल्याचा आरोप राऊत यांनी केला.