जिल्ह्यात काँग्रेसचा दुसऱ्यांदा ‘भोपळा’
By admin | Published: October 19, 2014 11:38 PM2014-10-19T23:38:31+5:302014-10-20T00:44:36+5:30
विधानसभा : १९५७ नंतर प्रथमच नामुष्की
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या ७७ वर्षांच्या वाटचालीत १६ निवडणुका झाल्या. त्यापैकी चौदा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने प्रतिनिधित्व केले. नेहमीच काँग्रेसचे राजकारणावर वर्चस्व राहिलेल्या कोल्हापुरी राजकारणात २०१४च्या निवडणुकीत दुसऱ्यांदा ‘भोपळा’ हाती लागला आहे. काँग्रेसचा एकही आमदार निवडून न येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या झंझावातात काँग्रेसचा डाव्या व समाजवादी पक्षांनी सुपडासाफ केला होता. आता तो उजव्या विचारांच्या पक्षाने केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व १९३७ मध्ये झाली. त्यासाली पहिली निवडणूक झाली. तेव्हापासून आजवर सोळा निवडणुका झाल्या. त्यापैकी स्वातंत्र्यपूर्व दोन (१९३७ व १९४६), तर स्वातंत्र्योत्तर काळात परत महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी दोनवेळा (१९५२ व १९५७) निवडणुका झाल्या. मात्र, १९५२ पूर्वी कोल्हापूर जिल्हा हा स्वतंत्र संस्थान असल्याने विधानसभेवर प्रतिनिधित्व नव्हते. स्वतंत्र भारतात १९५२ पासून २०१४ पर्यंत चौदा निवडणुका झाल्या. त्या सर्व निवडणुकीत काँग्रेसचे राजकारणच केंद्रस्थानी राहिले आहे. १९५२ ते १९७२ पर्यंत अकरा जागा होत्या. १९७८ ते २००४ पर्यंत बारा आमदार निवडून दिले जात होते. २००९ पासून ही संख्या दहावर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सतत प्रभाव निर्माण करीत निम्म्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली सर्व
डावे-समाजवादी पक्ष एकत्र आले होते. या पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी १९५७मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला आव्हान दिले होते. त्यात शेकाप, समाजवादी, लाल निशान पक्ष, भारतीय कम्युनिस्ट तसेच अपक्ष अशा अकराच्या अकरा उमेदवारांनी काँग्रेसचा पराभव करीत निवडून आले होते. त्या निकालाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मोठे बळ कोल्हापूर जिल्ह्याने दिले होते, असे मानले जाते. त्यामुळे या चळवळीचे मुंबई खालोखाल महत्त्वाचे केंद्र म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते.
मात्र, १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर काँग्रेसने आपले वर्चस्व निर्माण करीत अकरा पैकी दहा जागा जिंकल्या होत्या. ती आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागा काँग्रेसने केव्हाच जिंकल्या नसल्या, तरी किमान ७० ते ७५ टक्के जागा नेहमीच जिंकत आली आहे. २००४च्या निवडणुकीत केवळ तीन, तर २००९ च्या निवडणुकीत दोन जागा मिळाल्या. आताच्या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवार असताना काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. सतेज पाटील, भरमू सुबराव पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, आदी माजी मंत्री, डॉ. सा. रे. पाटील, पी. एन. पाटील हे माजी आमदार रिंगणात होते. मात्र, त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही. पी. एन. पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना स्वत:ची जागा जिंकता आली नाही. किंबहुना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. राधानगरी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नव्हता. कागलमध्ये अत्यंत नवख्या कार्यकर्त्याला ऐनवेळी उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसला दुसऱ्यांदा निच्चांकी पराभव पाहावा लागला. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचा पराभव
कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी नऊच जागा लढविणाऱ्या काँग्रेसचे सर्व उमेदवार हरले. एवढेच काय, काँग्रेस पक्षाचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचाही पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात पराभव झाला.
काँग्रेस आमदारांची संख्या
२०१४ -० २००९ - २
२००४ - ३ १९९९ - ५
१९९५ - ७ १९८५ - ६
१९८० - ८ १९७८ - ७
१९७२ - ८ १९६७ - ७
१९६२ - १० १९५७ - ०
१९५२ - ५