काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास शिवसेनेचा नकार
By admin | Published: August 2, 2016 06:09 PM2016-08-02T18:09:08+5:302016-08-02T18:09:08+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना विरोधकांसोबत हातमिळवणी करतीये का असं वाटत असतानाच शिवसेनेने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना विरोधकांसोबत हातमिळवणी करतीये का असं वाटत असतानाच शिवसेनेने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. अखंड महाराष्ट्राबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये असं ठणकावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावर शिवसेना समाधानी असल्याची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण आलं होतं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र आघाडीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे, मात्र त्याबाबत अजिबात तडजोड करणार नाही, असंही एकनाथ शिंदे बोलले आहेत.
मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करुन चर्चादेखील केली होती. फोनवर झालेल्या चर्चेनुसार वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली. त्यामुळे शिवसेना भाजपाची कोंडी करण्यासाठी नवी खेळी करणार अशी शक्यता व्यक्त होत होती.