शिवसेनेला 'हात' देण्याचे काँग्रेसचे संकेत
By admin | Published: February 24, 2017 11:37 AM2017-02-24T11:37:32+5:302017-02-24T11:39:56+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा दोघे मोठे पक्ष ठरले असले तरी, जनतेने कुठल्याही एकापक्षाला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा दोघे मोठे पक्ष ठरले असले तरी, जनतेने कुठल्याही एकापक्षाला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही. मुंबई महापालिकेची स्थिती त्रिशंकू आहे. सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही दोन पक्षांना एकत्र येणे आवश्यक आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये वैचारीक समानता असली तरी, सध्याची बदललेली समीकरणे लक्षात घेता दोन्ही पक्षांना परस्परांसोबत युती करण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही.
शिवसेना भाजपा एकत्र आले तर, यावेळी शिवसेनेला संख्याबळानुसार भाजपाला निम्मा वाटा द्यावा लागेल. जे शिवसेनेला मान्य नाही. अशावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा पर्याय शिवसेनेसमोर आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठी वैचारीक दरी असली तरी, दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळलेली नाही.
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्यांना तुम्ही शिवसेनेची सत्ता स्थापनेची अडचण सोडवणार का ? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सध्या आमची वाट पाहण्याची रणनिती आहे. महापालिकेत काँग्रेसने काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल असे उत्तर दिले. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेला काँग्रेसची साथ मिळू शकते.
यापूर्वी शिवसेनेने दोनवेळा भाजपा प्रणीत राओल आघाडीमध्ये सहभागी असूनही काँग्रेसने निवडलेले राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेस त्या पाठिंब्याची परतफेड यावेळी करु शकते. भाजपाच्या हाती महापालिकेची सत्ता देऊन भाजपला अधिक बळकट करण्यापेक्षा त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे हित जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात शिवसेनेला मिळू शकतो. शिवसेना काँग्रेससोबत जाणार नाही असे भाजपाच्या नेत्यांना वाटत असले तरी, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी एकत्र येऊ शकतात मग मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना का नाही ? असा प्रश्न काही शिवसैनिकांनी विचारला आहे.