दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी- अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:03 AM2018-12-10T02:03:22+5:302018-12-10T02:03:45+5:30
काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.
चिखली (बुलडाणा) : राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीचा मुकाबला शेतकऱ्यांनी हिमतीने करावा. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.
भाजपा सेनेचे सध्याचे राजकारण म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून वाटून खाऊ असे झाले असून ते केवळ जनतेला दखाविण्यासाठी भांडतात. मात्र सत्तेचा मलीदा चाटून खातात, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. खा. चव्हाण म्हणाले की, विदर्भातील संघर्ष यात्रेच्या समारोप सभेला मिळालेल्या प्रतिसादातून सरकारच्या विरोधात असलेला जनतेचा रोष दिसून येत आहे. तोच मतपेटीच्या माध्यमातून भाजप-सेना सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. महाआघाडी करून मतविभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले.
संधीसाधुंना कायमचा आराम देण्याची वेळ
राम मंदीराचा प्रश्न भाजपा सेनेने सोडविला नाही. निवडणुका आल्यावरच यांना राम आठवतो. आता तर भाजपा सोबत सेनेचे उद्धव ठाकरे सुध्दा अयोध्येला जावून नौटंकी करून आले. पण संधीसांधुना आता कायमचा आराम देण्याची वेळ आल्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विधवा महिला शेतकरी संगीता मोरे यांनी सरकार विरोधात लढा उभा करण्यासाठी विखे पाटील यांना रूमने भेट देऊन सरकारचा समाचार घेण्याची विनंती केली.