पुरस्कृत उमेदवारास काँग्रेसचा पाठिंबा - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:01 AM2018-05-12T03:01:18+5:302018-05-12T03:01:18+5:30
उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अचानकपणे माघार घेतली असली तरी
उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अचानकपणे माघार घेतली असली तरी राष्टÑवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या उमेदवारास आमचा पाठिंबा राहिल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघांत राष्टÑवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी अचानक माघार घेतल्याने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यावर चव्हाण म्हणाले, भाजपाने राजकीय खेळी करून कराड यांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवाराला काँग्रेसने समर्थन दिले आहे.
भाजपाची स्थिती मजबूत पंकजा मुंडे यांचा दावा
लातूर : राष्ट्रवादीकडून कोणतीही आकडेवारी सांगण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात भाजपाचीच स्थिती मजबूत आहे, असा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
यांनी केला.
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील भाजपा समर्थक मतदारांची व्यापक बैठक घेण्यात आली. पंकजा मुंडे म्हणाल्या, नागपूरनंतर लातूर हे भाजपचे सर्वाधिक सत्ता केंद्र आहे. निवडणुकीबाबत लातूर व बीडमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण केले जात असले, तरी त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांच्या पक्षाची नामुष्की झाली आहे.