Sushil Kumar Shinde on Sharad Pawar: “शरद पवारांनी युपीए अध्यक्ष व्हावे ही लोकांची मागणी, पण ते पदच रिकामे नाही”: सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:47 PM2022-04-12T18:47:00+5:302022-04-12T18:48:10+5:30
Sushil Kumar Shinde on Sharad Pawar: ब्राह्मण, मराठा, दलित सर्वांनी सर्वधर्म समभावाची पूजा केली पाहिजे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानाची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) राज्याचे मुख्यमंत्री असते, तर चित्र वेगळे असते, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. शिवसेनेनेदेखील यावर उत्तर दिले. या वक्तव्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांना प्रसार माध्यमांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यासंबंधी विचारले असता त्यांनी त्यांनाच विचारा असे सांगत उत्तर देणे टाळले. दरम्यान युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असले, काही लोकांची मागणी असली, तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही आहे असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
काय बोलावे हेच कळत नाही
काय बोलावे हेच कळत नाही. आम्ही जो काळ अनुभवलेला आहे त्यावेळी काही परंपरा, इतिहास, संकल्पना आणि काही संकेत पाळून बोलत होतो. आज ते कमी झाले आहे. याच्यातूनही ते सुधारतील अशी अशा आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी नमूद केले. सुजात आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, एका जातीला दोष देण्यात अर्थ नाही. ब्राह्मण, मराठा, दलित सर्वांनी सर्वधर्म समभावाची पूजा केली पाहिजे असे माझे मत आहे. कोणी जातीचा प्रश्न हाताळत असेल तर हे योग्य नाही. जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही. त्यामुळे आता झालेल्या गोष्टी हातात घेऊन महाराष्ट्र चालणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावे. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय, पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र अजून वेगळे असते, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते. शरद पवार अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलताना मुख्यमंत्री पदाबाबद मोठे वक्तव्य केले होते.