“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:40 PM2024-04-17T16:40:59+5:302024-04-17T16:41:22+5:30
Congress SushilKumar Shinde News: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Congress SushilKumar Shinde News: सोलापुरातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
महायुतीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. राम सातपुते गरिबाघरचा आहे. ऊस तोडणी कामगारांचा मुलगा आहे. त्याला हिणवू नका. त्याचा अपमान करू नका. लोकसभेची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. सोलापूर आणि माढ्यासाठी काही नेते नुकतेच एकत्र आले. या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यात सिंचनाची स्वप्ने दाखवली. पण हे स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही पूर्ण करणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते-पाटील यांचे नाव न घेता केली. या टीकेवर सुशीलकुमार शिंदेंनी पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात
सोलापूर जिल्हा पारंपारिक दुष्काळी आहे. ४५ वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारले गेले. सोलापूर जिल्ह्यास उजनी धरणाचे पाणी पुरत नाही. असे असले तरी सोलापूरचे चित्र बदलत आहे. ऊस, फळबागा अशा नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर मात झाली आहे. एकापेक्षा जास्त लहानमोठी धरणे असायला, सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही. देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्याचा त्यांना विसर पडला असावा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, असा पलटवार सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
दरम्यान, माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तसेच अकलूज येथे शिवरत्न बंगल्याच्या एका बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर माजी गृहमंत्री सुशील शिंदे, माजी खासदार मोहिते पाटील व मी एकत्र आलो आहे, याचा महाराष्ट्रात निश्चित फरक पडणार असल्याचे शरद पवारांनी यांनी म्हटले होते.