“कुठल्याही पदाची मागणी नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ते करणार”; आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 13:20 IST2023-06-18T13:17:22+5:302023-06-18T13:20:27+5:30
Ashish Deshmukh Join BJP: काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

“कुठल्याही पदाची मागणी नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ते करणार”; आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश
Ashish Deshmukh Join BJP: काँग्रेसमधून निलंबित केलेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजपा पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आशिष देशमुख यांनी भाजप प्रवेशाआधी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती.
आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. यानंतर आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले होते.
विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे
२००९ मध्ये नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश भाजपमध्ये झाला होता. पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देऊ केली होती. मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे, असे आशिष देशमुख यांनी म्हटले होते.
दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख हे पुत्र आहेत. आशिष देशमुख यांनी राजकीय धडे काँग्रेसमध्ये गिरविले. मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपत असताना आमदार म्हणून निवडून आले. मात्र, भाजपमध्ये त्यांचे पटले नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. भाजप सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तेथेही अन्य कोणाशी फारसे पटले नाही. आता पुन्हा त्यांनी भाजपचा मार्ग पत्करला आहे.