काँग्रेस - राष्ट्रवादीमधील चर्चा निष्फळ
By Admin | Published: September 23, 2014 11:36 AM2014-09-23T11:36:38+5:302014-09-23T12:19:57+5:30
आघाडीतील जागावाटपासंदर्भात मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक निष्फळ ठरली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - आघाडीतील जागावाटपासंदर्भात मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक निष्फळ ठरली आहे. मंगळवारी रात्री पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते मुंबईत बैठक घेतील अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
युतीपाठोपाठ आघाडीमध्येही जागावाटपावरुन तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने १२४ जागा द्यायची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला ११४ जागा दिल्या होत्या. यंदा लोकसभेत राष्ट्रवादीचा जास्त जागांवर विजय झाल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १२४ जागा (१० जागा वाढवून) देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली. मात्र राष्ट्रवादीने जास्त जागांची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे कोणत्याही तोडग्याविनाच ही बैठक संपली. रात्री आठनंतर दोन्ही पक्षांचे नेते चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक घेतील अशी माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिली. राष्ट्रवादीच्या मागणीविषयी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु असेही राणेंनी नमूद केले. संध्याकाळच्या बैठकीत आघाडीविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले.