काँग्रेस आघाडीत चर्चेआधीच तणाव
By admin | Published: September 15, 2014 02:30 AM2014-09-15T02:30:17+5:302014-09-15T02:30:17+5:30
महायुतीमध्ये कमालीचा तणाव असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेआधी तणाव दिसत आहे. राष्ट्रवादीला ११४ पेक्षा एकही जागा जास्त देण्याची गरज नाही
मुंबई : महायुतीमध्ये कमालीचा तणाव असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेआधी तणाव दिसत आहे. राष्ट्रवादीला ११४ पेक्षा एकही जागा जास्त देण्याची गरज नाही, अशी उघड भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतली
आहे. दुसरीकडे किमान १६ ते १८ जागा वाढवून मागण्याची भूमिका काँग्रेससोबतच्या चर्चेत घ्यायची आणि त्यावर ठाम राहायचे, असे राष्ट्रवादीने ठरविले असल्याचे समजते.
महायुतीमध्ये अत्यंत तणावाचे चित्र असताना उद्या महायुती तुटली तर आपणही स्वबळावर लढावे, असा राष्ट्रवादीमध्ये वाढता दबाव आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसा सूर लावला असल्याचे म्हटले जात आहे.
आम्हाला आघाडीमध्ये १४४ जागाच हव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीरपणे केली. गेल्यावेळी राष्ट्रवादीने ११४ तर काँग्रेसने १७४ जागा लढविल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील चर्चा येत्या दोन दिवसांत दिल्लीत होईल.
काँग्रेसच्या नेतृत्वाने १० जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव ठेवला तर तो आम्ही स्वीकारणार नाही, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज लोकमतशी बोलताना सांगितले. महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना तणाव निर्माण झाला असून आघाडीमध्ये चर्चेआधी तणावाची स्थिती आहे. (विशेष प्रतिनिधी)