विदर्भात काँग्रेसची अग्निपरीक्षा

By admin | Published: February 12, 2017 01:23 AM2017-02-12T01:23:27+5:302017-02-12T01:23:27+5:30

विदर्भात निवडणुका होऊ घातलेल्या सहा जिल्हा परिषदांपैकी चार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर दोन ठिकाणी भाजपा सत्तेवर आहे. पण विधानसभा निवडणुकात पानिपत

Congress trials in Vidharbha | विदर्भात काँग्रेसची अग्निपरीक्षा

विदर्भात काँग्रेसची अग्निपरीक्षा

Next

- दिलीप तिखिले,  नागपूर

विदर्भात निवडणुका होऊ घातलेल्या सहा जिल्हा परिषदांपैकी चार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर दोन ठिकाणी भाजपा सत्तेवर आहे. पण विधानसभा निवडणुकात पानिपत झाल्यानंतर आणि अलीकडेच झालेल्या नगर परिषद निवडणुकीतही सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी पूर्णत: बॅकफूटवर आली आहे. जि.प. निवडणुकीत त्यांना विदर्भातील गड कायम राखण्यात यश येईल की अपयशाची हॅट्ट्रिक ते करतील, हा प्रश्न चर्चेचा झाला आहे.

घराणेशाही : यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड यांचे बंधू विजय दुलीचंद राठोड, पुसदचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे पुत्र ययाती नाईक, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे माजी आ. अविनाश वारजूकर यांचे बंधू सतीश वारजूकर, काँगे्रसचे दिवंगत नेते वामनराव गड्डमवार यांच्या कन्या नंदा अल्लूरवार, राजुरा तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ. प्रभाकरराव मामुलकर यांचे भाचे देवराव नलगे यांच्या पत्नी मेघा नलगे, गडचिरोलीत माजी राज्यमंत्री व धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम तथा माजी आ. दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता आत्राम मैदानात आहेत.

यवतमाळ
यवतमाळात सेना, भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात उभे ठाकल्याने तेथील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी यंदा जिल्हा परिषदेत आपल्या जागा चार वरून ४४ पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे पालकमंत्रिपद काढून घेतल्याने शिवसेनेने या निवडणुकीत भाजपाला आडवे करण्याची गर्जना केली आहे. काँग्रेसची नेतेमंडळी निवडणूक काळापुरती का होईना गटबाजी विसरून आपआपल्या विधानसभा मतदारसंघात पक्षकार्यात भिडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अमरावती
चारही प्रमुख राजकीय पक्षांना यंदा बंडखोरीची लागण झाली आहे. जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार असूनही जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांना स्थान नाही. जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी भाजपाची जशी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे तसेच पालिका निवडणुकीत सपाटून आपटलेल्या काँग्रेससाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. आमदार वीरेंद्र जगताप आणि यशोमती ठाकूर यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा आहे. भाजपाचे आमदार अनिल बोंडे यांना शह देण्यासाठी वरूड आणि मोर्शी तालुक्यात काँग्रेस-राकाँने आघाडी केली.

वर्धा
जिल्हा परिषदेवर पहिल्या अडीच वर्षांत काँग्रेस आघाडी आणि नंतरच्या अडीच वर्षांत भाजपाचा झेंडा होता. हातून गेलेली सत्ता परत मिळविण्याचे आव्हान काँग्रेसचे आ. रणजित कांबळे, अमर काळे व राष्ट्रवादीचे माजी आ. सुरेश देशमुख यांच्यापुढे आहे. आयारामांना पायघड्या घालणाऱ्या भाजपात बंडखोरांची फौज तयार झाली. खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांच्यातील अंतर्गत गटबाजीने पक्ष पोखरलेला आहे.

चंद्रपूर
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे वाढते प्रस्थ इतर पक्षांच्या जिव्हारी लागले आहे. असे असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अखेरपर्यंत आघाडी होऊ शकली नाही. शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी आधीपासूनच भाजपाबासोबत फारकत घेण्याची भाषा वापरून युती न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसधील भांडणे अगदी निवडणूक चिन्ह वाटप होण्याच्या दिवसापर्यंत सुरू होती. भाजपाकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रचारात उडी घेतली आहे.

गडचिरोली
ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांचा सहकार गट भाजपाच्या जोडीला आहे. या भागात शिवसेनेचे वर्चस्व बऱ्यापैकी होते. मात्र गटबाजीमुळे ओहोटी लागली. अहेरी विधानसभा मतदारसंघात परंपरागत नाग विदर्भ आंदोलन समितीने भाजपाशी सलगी केली असून राजे अम्ब्रीशराव आत्राम भाजपाच्या निवडणुकीची सर्व सूत्रे सांभाळून आहेत. सिरोंचा भागात काँग्रेसचेही मजबूत आव्हान भाजपासमोर आहे. त्यामुळे येथील लढत महत्त्वाची असेल.

बुलडाणा
बुलडाण्यात सेना व भाजपाची युती तुटल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची घडीही विस्कटली. सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपाच्या प्रचाराची धुरा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्या खांद्यावर आहे. तर काँग्रेसकडून मुकूल वासनिक, आ. राहुल बोंद्रे व आ. हर्षवर्धन सपकाळ सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा आहे.

Web Title: Congress trials in Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.