“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:18 PM2023-07-31T14:18:43+5:302023-07-31T14:19:09+5:30
Sharad Pawar And Congress: PM मोदींसोबत कार्यक्रमाला न जाण्याबाबत मविआतून शरद पवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
Sharad Pawar And Congress: टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसहशरद पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींसह कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शरद पवारांना केले जात आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनही शरद पवार यांना कार्यक्रमाला जाण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मुख्य ट्रस्टी दीपक टिळक यांच्या हस्ते दिला जाईल. राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु याबाबत रोहित टिळक यांनी शरद पवार हे या कार्यक्रमाला हजर राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आता शरद पवार यांना आवाहन केले आहे.
मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येत आहेत. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळावे. महाविकास आघाडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय. त्याचा निषेध करतोय.अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाही. त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणे, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेसतर्फे आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये महिला मदतीचा हात मागत होत्या. पण केंद्र सरकारने फक्त तमाशा पाहिला. देशाचे पंतप्रधान फॉरेनला फिरत होते. पण मणिपूरला जायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांनी काहीही मदत केली नाही. रोहित टिळक यांना समज देण्यात आलेली आहे. सर्व हेवेदावे बाजूला सोडून त्या ठिकाणी विरोध करणे गरजेचे आहे. पक्षाची जी लाईन आहे महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्या खातर त्यांनी पुन्हा एकदा विचार करा, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.