“विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:56 PM2024-02-01T14:56:53+5:302024-02-01T14:57:33+5:30

Congress Vijay Wadettiwar On Budget 2024: हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

congress vijay wadettiwar criticised central govt over budget 2024 | “विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार

“विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar On Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. पायाभूत सुविधा, संरक्षण आणि रेल्वेवर अधिक भर देण्यात आला असून, शेती आणि शेतकरी कल्याणावर कमी तरतूद करण्यात आली आहे. यावरून आता विरोधक केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करत आहेत. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम आहे, या शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला  आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

अर्थसंकल्पात युवकांसाठी, बेरोजगारांबाबत काही ठोस मांडलेले नाही

भांडवलदारांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार असून फक्त भाजपाचे उद्योजक स्नेही मित्र फायद्यात आहेत.  कॉर्पोरेट टॅक्स कमी केला पण सर्वसामान्यांना करात कोणतीही सूट देण्यात आली नाही. राज्यातील नेत्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मी पुन्हा येईन, अशी भाषा वापरली. गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारच्या योजना अपयशी ठरल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे अजून पूर्ण नाहीत. ओबीसी, एसी, एसटी विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळत नाही. एकीकडे सरकार दावा करते की २५ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढले. दुसरीकडे  आम्ही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देतो, हे सरकारकडून सांगितले जाते. यातील विरोधाभास स्पष्ट आहे. या अर्थसंकल्पात युवकांसाठी, बेरोजगारांबाबत काही ठोस मांडलेले नाही. या सरकारने युवकांना देशोधडीला लावले आहे. त्यामुळे बेरोजगार युवक म्हणजे सक्षम युवक का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला आहे. 

हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा

प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही आशा मावळली आहे. कष्टकरी मजूर, त्यांच्या कुटुंबासाठी सरकारने मदत केली नाही. केंद्रीय अर्थमंत्री दिवा स्वप्ने दाखवत आहेत. आत्मस्तुतीने भारावलेले केंद्रीय अर्थमंत्र्याचे भाषण अच्छे दिन प्रमाणे आभासी होते. पंतप्रधानांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. हे स्वप्न जसे  भंगले तसेच हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा, जुन्या कढीला नव्याने ऊत आणणारा आहे, असे सांगत अर्थसंकल्पाबाबत वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, देशातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, गरीब, वंचित, उपेक्षित घटक देशोधडीला लागणार आहे. कृषी, उद्योग, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार, बांधकाम व्यवसाय  या सर्व क्षेत्राचे भविष्य अंधःकारमय  आहे. गरीब-श्रीमंतीची दरी वाढवणार हा अर्थसंकल्प आहे. परकीय गुंतवणुकीचा सरकारचा दावा खोटा असून  रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या आशा आकांशा धुळीस मिळाल्या आहेत. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. सरकार महिला सक्षमीकरणाची भाषा करते पण महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ रोखण्यात, मणिपूरमधला हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. या सरकारच्या काळात  शेतकरी उध्वस्त झाला. अजूनही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. पीक विम्याचा देशातील केवळ ४ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतोय.  पीक विम्याने शेतकऱ्यांचे भले होते की, पीक विमा कंपन्यांचे? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. 
 

Web Title: congress vijay wadettiwar criticised central govt over budget 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.