“लोकसभेची फायनल आम्हीच जिंकणार, तेलंगणात भाजपने जीवाचे रान केले पण...”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 01:47 PM2023-12-03T13:47:38+5:302023-12-03T13:48:05+5:30
Congress Vijay Wadettiwar: तेलंगणमधील जनतेने निकालातून सडेतोड उत्तर दिले आहे, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली.
Congress Vijay Wadettiwar: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीचे कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजप मोठ्या फरकाने आघाडीवर असून, तेलंगण येथे बीआरएसला धक्का देत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीतील नेते भाजपवर टीका करत आहेत. लोकसभेची फायनल आम्हीच जिंकणार, असा दावा काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
तेलंगणामध्ये मतमोजणी होत आहे. या सुरुवातीच्या कलात काँग्रेस आघाडीवर पाहायला मिळत आहे. अशातच आता देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांकडून तेलंगणा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाने जीवाचे रान केले. मात्र लोकांनी त्यांना नाकारले आहे. आजच्या निकालातून ते स्पष्टपणे दिसत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार म्हणाले.
तेलंगणमध्ये भाजपने जीवाचे रान केले पण...
भारतीय जनता पक्षाने तेलंगणात जीवाचे रान केले. मात्र लोकांनी त्यांना नाकारले. बीआरएस सरकारने संपूर्ण राज्य उध्वस्त करण्याचे काम केले. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने जनतेला विश्वास दिला. प्रियंका गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांनी मेहनत केली. राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे सरकार जनतेला आता नको. काँग्रेसने सर्व जाती धर्मला एकत्र घेतले. द्वेषाचे राजकारण इथे चालत नाही. इथे देशाचे राजकारण चालते. समाजात धर्मात विष पेरण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले. त्याला सडेतोड उत्तर या चार राज्यातील निकालातून भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे. चारही राज्यात काँग्रेस जिंकणार हा कार्यकर्त्यांकडून फीडबॅक मिळालेला आहे. त्या आधारावरती आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये आता आम्ही मागे असलो तरी बहुमताने सरकार स्थापन करणार हा आमचा विश्वास आहे. विद्यमान सरकारच्या बाबतीत कुठलाही प्रकारचा आरोप नव्हता. त्यामुळे जनतेने काँग्रेसला पसंती दिली. शंभर टक्के काँग्रेस जिंकणार आहे, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.