“राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपाने ठाकरे गट-मनसेत भांडण लावलेय”; काँग्रेस नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 14:37 IST2024-08-11T14:37:01+5:302024-08-11T14:37:24+5:30
Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

“राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपाने ठाकरे गट-मनसेत भांडण लावलेय”; काँग्रेस नेत्याची टीका
Vijay Wadettiwar News: मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर विरोधक टीका करत असताना, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. यानंतर ठाण्यातील सभेला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
मीडियाशी बोलताना काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी झाल्या घटनेबाबत भाष्य केले. राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना-मनसे पक्षात भाजपाने भांडण लावले आहे. ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षात भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे, असे सांगत, परमबीर सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी भाजपाचा सहारा घेतला. ते भाजपाच्या इशाऱ्यावर बोलतात, हे काही लपून राहिलेले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना बंड करायची आवश्यकता काय होती. ईडी, सीबीआयचा दबाव त्यांच्यावर होता हे नक्की, असे म्हणत कुठे काही झाले तरी शरद पवारांचे नाव घेतले जाते. मनोज जरांगे यांची अलीकडील विधाने पाहिली तर, त्यांनी शरद पवारांवरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे कोणत्याही वादात दिसत नाहीत, असे विजय वडेट्टीवार यांनी एबीपीशी बोलताना सांगितले.