“भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही”; एल्गार सभेत सहभागी झालेले विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:14 AM2023-11-20T10:14:20+5:302023-11-20T10:19:38+5:30
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपचा दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एल्गार सभेत बोलताना तीव्र शब्दांत टीका केली. यावरून दोन गट पडले असून, ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा देत असून, अन्य अनेक नेते मनोज जरांगे यांचे समर्थन करत असल्याचे दिसत आहेत. छगन भुजबळ यांच्यासोबत एल्गार सभेत सहभागी झालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा कुटुंबांच्या मागील दोन-तीन पिढ्यांमधल्या कुणबी नोंदी आहेत अशा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे या मराठा कुटुंबांचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्यासाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची एल्गार सभा झाली. या सभेला विजय वडेट्टीवार यांनीही उपस्थिती लावली होती. मात्र, यानंतर विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.
छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही
छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही. मी माझी स्वतःची आणि पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाणार आहे. भुजबळांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे विचार वेगळे असून भूमिकाही वेगळ्या आहेत. मी ओबीसींसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ते करत असताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी आमची भूमिका आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपाचा दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या आरोपांवर बोलताना, अशी चर्चा मीही ऐकली आहे. माझ्या कानावर तो विषय आला आहे. विरोधी पक्षनेता असल्यामुळे कोणावरही आरोप करण्यापूर्वी त्यासंदर्भात थोडी अधिक माहिती घेऊ द्या, त्यानंतर यावर बोलेन. मला वाटले की, यामागे कोणाचे तरी अदृष्य हात आहेत तर मग मी त्याचा पडदा टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.