“संभाजी भिडेंना तुरुंगात कधी टाकणार? अन्यथा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल, माणसाची लायकी...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:46 AM2023-08-02T10:46:17+5:302023-08-02T10:48:26+5:30
Sambhaji Bhide Vs Congress: काँग्रेसला डिवचणे, राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, RSSच्या लोकांचे गुणगाण करणे हे संभाजी भिडे सातत्याने करतात, अशी टीका करण्यात आली आहे.
Sambhaji Bhide Vs Congress: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांना अटक करावी, ही मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. यातच संभाजी भिडेंना तुरुंगात कधी टाकणार, अशी विचारणा काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
टोपणनाव लावून भिडे मराठी मुलांना भुरळ घालत आहेत. ते विष ओकण्याचे काम यासाठी करतात की जातीय तेढ निर्माण व्हावे. मतांचे केंद्रीकरण व्हावे आणि सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा हा त्यांचा उद्देश असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसला डिवचणे, राष्ट्रपुरुष-महात्मांचा अपमान करणे, आरएसएसच्या लोकांचे गुणगाण करणे हे काम ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे कोणी कितीही नाकारले तरी हे भाजपला पोषक आहे. हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे, त्यामुळे त्यांचा बोलविता धनी हा सत्तापक्ष आहे हे सांगण्याची गरज नाही, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.
अन्यथा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल
जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाहीत. अशा गलिच्छ शब्दांत या माणसाने वक्तव्य केले आहे. म्हणून त्याला असेल तिथून उचलून कोठडीत घालावे, ही सरकारकडून अपेक्षा आहे. बहुजनांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान आणि त्याच्याही पलिकडे जाऊन जिथे स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले, त्या साईबाबांचा अपमान, करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या करोडो लोकांचा अपमान या पापभिरु माणसाने केलेला आहे. यावरुनच या माणसाची लायकी आणि जागा कोठडीत आहे. या माणसावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वतः उपमुख्यंत्र्यांनी राष्ट्रपित्या अपमान सहन करु शकत नाही अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता भिडेंना कधी तुरुंगात टाकणार हा प्रश्न आहे. अन्यथा आम्हाला याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा थेट इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
दरम्यान, संभाजी भिडेंच्या विधानाची फॉरेन्सिक चाचणी करण्याची गरज नाही. त्यांनी जाहीरपणे केलेली ही विधाने आहेत. त्यावर माध्यमांमधून छापून आलेले आहे. भिडेंवर कारवाई करण्यात वेळकाढूपणा करण्याचे काम सरकारकडून केले जात आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.