काँग्रेस जागावाटपावर ठाम
By Admin | Published: September 1, 2014 01:57 AM2014-09-01T01:57:42+5:302014-09-01T01:57:42+5:30
आघाडीमध्ये विधानसभेची एकही जास्त जागा सोडू नये, असे आपले मत आहे आणि आपण ते श्रेष्ठींना कळविले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिली
यदु जोशी, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये विधानसभेची एकही जास्त जागा सोडू नये, असे आपले मत आहे आणि आपण ते श्रेष्ठींना कळविले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिली. राष्ट्रवादीला जागा वाढवून मागण्याचा अधिकार काय, असा सवालही त्यांनी केला.
२००९ च्या निवडणुकीत आम्ही १७४ आणि राष्ट्रवादीने ११४ जागा लढविल्या होत्या. तेच सूत्र यावेळीही कायम राहिले पाहिजे. हे सूत्र बदलण्याचा कोणता तर्क त्यांच्याकडे आहे, असा सवाल ठाकरे यांनी
केला. जागा वाढवून मागायच्या असतील तर काही आधार त्यासाठी असला पाहिजे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यापेक्षा २० जागा जास्त जिंकल्या होत्या. ते ६२ तर आम्ही ८२ जागा जिंकलेल्या होत्या. तो आधार आम्ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात घेतला असता तर आम्हाला जागा वाढवून मिळाल्या असत्या पण त्यावेळी राष्ट्रवादीने ठाम नकार दिला होता. आता त्यांना जागा वाढवून मागण्याचा अधिकार नाही, असे माणिकराव म्हणाले. राष्ट्रवादीला जागा वाढवून देऊ नयेत, ही प्रदेश काँग्रेसची मानसिकता आहे. अर्थात जागा वाटपाचा चेंडू आता श्रेष्ठींच्या कोर्टात आहे.
निर्णय दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना घ्यायचा आहे. पण आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत, असे ते म्हणाले. काँग्रेसने राष्ट्रवादीला १२० जागा देवू केल्या आहेत, या वृत्ताकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्लीत केलेल्या चर्चेत असे काही झाल्याचे ऐकिवात आहे.
काँग्रेस श्रेष्ठींनी आम्हाला तसे अधिकृतपणे काहीही कळविलेले नाही. जागा वाटपाचा सन्मानजनक तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका आपण आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. आता एकही जागा वाढवून देवू नये, अशी भूमिका आपण घेत आहात याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सन्मानजनक तोडग्याची समोरच्यांची तयारीच नसेल तर मी मांडतोय ती भूमिका योग्यच आहे.