परभणीत काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

By admin | Published: April 21, 2017 08:27 PM2017-04-21T20:27:26+5:302017-04-21T20:27:26+5:30

परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३१ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेसाठी पक्षाला केवळ दोन

Congress was the biggest party in Parbhani | परभणीत काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

परभणीत काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

Next
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 21 - येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३१ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेसाठी पक्षाला केवळ दोन जागांची गरज आहे. निवडून आलेले दोन्ही  अपक्ष काँग्रेसचे बंडखोर असल्याने काँग्रेसच्या सत्ता स्थापनेतील अडसर दूर झाला आहे.
परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारी मतमोजणी झाली. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक म्हणजे ३१ उमेदवार निवडून आले असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ उमेदवार निवडून आले आहेत. मोठ्या ताकदीने प्रचारात उतरलेल्या शिवसेनेची मात्र वाहताहत झाली असून या पक्षाचे केवळ ६ सदस्य निवडून आले आहेत. गेल्यावेळी केवळ २ संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत चांगली  कामगिरी केली असून या पक्षाचे ८ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय शहरातील प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १६ मध्ये प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार निवडून आला असून हे दोन्ही अपक्ष उमेदवार काँग्रेसचे बंडखोर आहेत. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला दोन जागांची गरज असून हे दोन्ही अपक्ष बंडखोर काँग्रेसकडे येऊ शकतात. परंतु, काँग्रेसकडून सद्यस्थितीत तरी या अपक्षांशी संपर्क साधण्यात आलेला नाही. 
काँग्रेसची राष्ट्रवादीशी आघाडी होण्याची शक्यता
येथील महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३० जागा मिळवून पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या मदतीने महापौरपद मिळविले होते. परंतु, नंतरच्या अडीच वर्षात काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीने महापौरपद तर काँग्रेसने उपमहापौरपद घेतले होते. यावर्षीच्या निवडणुकीत उलटी स्थिती आहे. यावेळी काँग्रेसने ३१ जागा मिळविल्या असून राष्ट्रवादी दुसºया क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रचारात केलेले आरोप विसरुन राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे माजी आ.सुरेश देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसभवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले व अपक्षांपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेस मनपात सत्तेवर येऊ शकते, असे सांगितले. त्यामुळे मनपात पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे.  
दिग्गजांचा झाला पराभव
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महापौर संगिता वडकर यांचे पती राजेंद्र वडकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांचे बंधू शिवाजी भरोसे, भाजपाचे गटनेते दिलीपसिंह ठाकूर, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे या दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. 
दोन मतांनी राष्ट्रवादीच्या दुधगावकर विजयी
शहरातील प्रभाग क्रमांक १० ड मध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाली. मतमोजणीत प्रारंभी राष्ट्रवादीच्या उमेदवार संगिता दुधगावकर व शिवसेनेच्या उमेदवार सुनिता सामाले यांना समसमान म्हणजे २४८८ मते मिळाली होती. त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती सामाले यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार दुधगावकर यांना  १ मत वाढून एकूण २४८९ मते मिळाली. तर शिवसेनेच्या श्रीमती सामाले यांना २४८७ मते मिळाली. या निवडणुकीत फक्त दोन मतांनी राष्ट्रवादीच्या संगिता दुधगावकर विजयी झाल्या. 
राष्ट्रवादीची गेली सत्ता
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहील, अशी चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास नडला. या पक्षाचा राज्यस्तरावरील एकही नेता शहरात प्रचारासाठी आला नाही. शिवाय बाहेरील कोणत्याही नेत्याने शहरात जाहीर सभा घेतली नाही. परिणामी या पक्षाला मनपातील सत्ता कायम ठेवता आली नाही.

Web Title: Congress was the biggest party in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.