राज्यात आता कॉँग्रेसची लाट
By admin | Published: October 1, 2014 10:53 PM2014-10-01T22:53:47+5:302014-10-02T00:13:22+5:30
पतंगराव कदम : मोदींच्या सुनामीचा काळ संपला
सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदींची सुनामी होती. शंभर वर्षांतून एकदा सुनामी येत असते. त्यामुळे आता सुनामी संपली असून काँग्रेसची लाट आली आहे, असे मत माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांपासून आजअखेर महाराष्ट्रात पुरोगामी विचाराने कारभार चालला. महाराष्ट्राची जनता अशा विचारांनाच स्थान देते. आता काही लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पहात आहेत. त्यांना जनता खड्यासारखे बाजूला करेल. त्याची सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वत्र काँग्रेसचे वारे आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत काँग्रेस पुढे येईल. पंधरा वर्षांत प्रथमच चारही पक्ष आमने-सामने आले आहेत. खुल्या पद्धतीने या निवडणुका होत असल्याने प्रत्येकाला त्यांची ताकद कळेल. संपूर्ण राज्यात सर्वाधिक प्रतिसाद काँग्रेसला मिळत आहे. त्यामुळे कुठेही पक्षाला अडचण नाही. बंडखोरांबाबत दोन दिवसात आम्ही योग्य भूमिका घेतली. अशा लोकांना समजावून सांगण्यात आले.
पलूस-कडेगाव मतदारसंघात विरोधकांच्या स्टंटबाजीची कल्पना लोकांना आहे. आम्ही कामाच्या जोरावर, तर विरोधक स्टंटबाजीच्या जोरावर निवडणूक लढवित आहेत. या गोष्टींचा निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)