काँग्रेस आरबीआयला घेराव घालणार
By admin | Published: January 17, 2017 06:04 AM2017-01-17T06:04:11+5:302017-01-17T06:04:11+5:30
रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीे
मुंबई : नोटाबंदी आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष १८ जानेवारी रोजी मुंबई आणि नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीे.
काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. नोटाबंदी आणि सरकारच्या जनविरोधी कारभाराविरूद्ध आंदोलन आणखी तीव्र करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. १८ जानेवारीवह मुंबईत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेला घेराव घालण्यात येईल. त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील रिझर्व बँक कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. तर २९ जानेवारी रोजी मुंबईत पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा होईल, असे शिंदे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)