काँग्रेसचे दुसरे स्थान कार्यकर्तेच राखणार

By admin | Published: February 11, 2017 09:45 PM2017-02-11T21:45:45+5:302017-02-11T21:45:45+5:30

नेत्यांची गटबाजी : दोन जिल्हा परिषदेत बहुमत, सात ठिकाणी दुसरे स्थान

Congress will maintain the second position of the party | काँग्रेसचे दुसरे स्थान कार्यकर्तेच राखणार

काँग्रेसचे दुसरे स्थान कार्यकर्तेच राखणार

Next

वसंत भोसले ---कोल्हापूर --पंचायत राज्य व्यवस्थेचा जनक पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षाची स्थितीही जिल्हा परिषदांच्या चालू निवडणुकीत दुसऱ्या स्थानावरच राहणार का? अशी अवस्था आहे. सिंधुदुर्ग आणि लातूरचे बहुमत टिकणार आणि सात जिल्हा परिषदांमधील सर्वांत मोठा पक्ष तसेच सात ठिकाणी दुसरे स्थान कार्यकर्त्यांच्या ताकदीवर टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गत निवडणुकीच्यावेळी सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील मोठा पक्ष असलेल्या कॉँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यात सर्वच नेत्यांची कसोटी लागली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि लातूरमधून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळवले होते. उर्वरित २३ जिल्हा परिषदांमध्ये सत्तारूढ होण्यासाठी तडजोडी कराव्या लागल्या. त्यापैकी सात जिल्हा परिषदांमध्ये कॉँग्रेस पक्ष सर्वांत मोठा म्हणून उदयास आला होता. त्यात कोल्हापूर (३१ सदस्य संख्या), नांदेड (२५), उस्मानाबाद (२०), बुलढाणा (२२), यवतमाळ (२३), चंद्रपूर (२१) आणि गडचिरोली (१४) या जिल्हा परिषदांचा समावेश होता.
सात जिल्हा परिषदांमध्ये कॉँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर होता. त्यात नगर (२८), पुणे (११), सातारा (२१), सांगली (२३), सोलापूर (१८), औरंगाबाद (१६) आणि वर्धा (१७) जिल्हा परिषदांचा समावेश आहे. बीड या एकमेव जिल्हा परिषदेत कॉँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. नाशिक (१४) आणि अमरावती (७) जिल्हा परिषदेत तिसऱ्या स्थानावर होता, तर जळगावमध्ये (१०) हा पक्ष चौथ्या स्थानावर राहिला. रायगड (७), रत्नागिरी (३), परभणी (८), जालना (३) आणि हिंगोली (९) या पाच जिल्हा परिषदांमध्ये एक आकडी सदस्य संख्या आहे.
गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई अनेक जिल्हा परिषदांमध्ये झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक नियोजनबद्ध आणि एकसंधपणे निवडणूक लढल्याने तो पक्ष प्रथम क्रमांकावर राहिला. सिंधुदुर्ग आणि लातूरमध्ये अनुक्रमे राणे, देशमुख यांच्या प्रभावामुळे स्पष्ट बहुमत मिळविले होते. सांगली, नगर, कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा आदी जिल्ह्यांत चांगली लढत दिली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला बहुमतासाठी केवळ चार जागा कमी पडल्या होत्या. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच सदस्यांशी आघाडी करून काँग्रेस स्वबळावर सत्तारूढ झाली होती. इतर अनेक ठिकाणी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असला तरी काही अपवाद वगळता सर्वत्र विरोधी बाकावरच त्यांना बसावे लागले होते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपा किंवा शिवसेनेबरोबर युती करून अध्यक्षपद पटकावले होते.



भाजपाचे आव्हान
येत्या निवडणुकीत सिंधुदुर्ग, लातूर, सांगली, नगर, आदी मोजक्याच जिल्ह्यांत आव्हान निर्माण करू शकेल अशी शक्यता दिसते. रायगड, बीड, हिंगोली, जालना, रत्नागिरी, आदी जिल्ह्यांत पक्षाची अवस्था दयनीय आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांत संधी असताना नेत्यांच्या गटबाजीमुळे या पक्षाला संधी साधता येत नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बिकट झाल्याने भाजपाच्या विरोधात आक्रमकपणे लढण्याची संधी आहे, असे अनेक ठिकाणी दिसते, पण नेत्यांनी एकसंधपणे प्रयत्नच सोडले आहेत. त्यामुळे दोन-तीन जिल्हा परिषदा वगळता बहुमताचा जादुई आकडा गाठणे कठीण दिसते.


भक्कम नेतृत्व
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे काही जिल्ह्यांचा अपवाद वगळले तर अनेक ठिकाणी नेतृत्व भक्कम आहे. त्यात नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवाय डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, विलास मुत्तेमवार, रोहिदास पाटील, अमरिश पटेल, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, सतेज पाटील आदी नेते कार्यकर्त्यांना चांगले बळ देऊ शकतात.
मात्र प्रदेश कार्यालयापासून जिल्हा कार्यालयापर्यंत अनेक ठिकाणी पक्षांतर्गत समन्वय कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान स्वीकारण्याची तयारी राज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पार्टीने केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी तडे गेल्याने काँग्रेसला संधी आहे. कार्यकर्त्यांना बळ मिळू शकते पण नेत्यांच्या पातळीवर एकसंघाने प्रयत्न होताना दिसत नाहीत.

परिणामी काही जिल्ह्यात तालुकानिहाय इतर पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांशी तडजोड करण्यात शक्ती खर्ची घालण्यात आली आहे. अशीच अवस्था नोव्हेंबरमध्ये
झालेल्या नगरपालिका निवडणुकीत असतानाही कार्यकर्त्यांनी काँग्रेसला दुसरे स्थान मिळवून दिले होते.
आजही काँग्रेसचा स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर कार्यकर्त्यांचा संच आहे आणि दोन तुल्यबळ पक्षांच्या विरोधात आगेकूच करण्याची संधी आहे.

Web Title: Congress will maintain the second position of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.