“चित्राताई यावर प्रतिक्रिया देणार की नाही?” भाजप जिल्हाध्यक्षांच्या व्हिडिओवर काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 04:37 PM2022-07-13T16:37:09+5:302022-07-13T16:38:13+5:30
हे ‘ईडी सरकार’ तर आहेच, पण आता ‘क्लीन चीट’ सरकार म्हणायचे का, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
राज्यात राजकीय संघर्ष तीव्र होत असतानाच, भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, हा प्रकार पाहिल्यानंतर भाजपच्या चित्राताईंची फार आठवण झाली. चित्राताई यावर प्रतिक्रिया देणार की नाही, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, भाजपमध्ये महिलांना मान-सन्मानाची वागणूक मिळत नाही. आम्ही भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा प्रकार बघितला. मान खाली घालायला लावणारा हा प्रकार आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.
आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी
एकंदरीत आपण पाहिले तर चंद्रकांत पाटील म्हणतात महिलांनी स्वयंपाक घरात जायला पाहिजे. यानंतर आता जिल्हाध्यक्ष अशी प्रकरणे करत आहेत. तसेही तुम्ही बघितले तर ते ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षात महिलांना फार मान-सन्मान असतो, अशातला हा भाग नाही. आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, पण अशी प्रकरणे लज्जास्पद आहेत. तेही सोलापूरसारख्या शहरात जिथे पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत, तिथला भाजपाचा जिल्हाध्यक्ष अशा प्रकारची कृत्ये करतो, हे निषेधार्य आहे, या शब्दांत यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, सगळ्यांना एकापाठोपाठ एक क्लीन चीट मिळते. त्यामुळे आपण त्यांना ‘क्लीन चीट’ सरकार म्हटले पाहिजे का? हे ‘ईडी सरकार’ तर आहेच. आधी ईडी लावायची, मग क्लीन चीट द्यायची. या सगळ्या गोष्टी संविधानाला आणि लोकशाहीला तडा देणाऱ्या आहेत. त्यामुळे जनसामान्यांनी विचार करायला हवा, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.