कॉग्रेसमधील सतेज विरोधक एकवटले
By Admin | Published: November 17, 2015 01:00 AM2015-11-17T01:00:30+5:302015-11-17T01:00:53+5:30
विधानपरिषदेची उमेदवारी : इच्छुकांच्या आज मुंबईत मुलाखती
कोल्हापूर : विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस इच्छुकांच्या आज, मंगळवारी दुपारी मुंबईत मुलाखती होणार आहेत. या निवडणुकीत उमेदवारीसाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे विरोधक एकवटल्याचे चित्र दिसत आहे.
विधानपरिषदेसाठी आपणालाच उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व माजी खासदार जयवंतराव आवळे यांनीही फोनवरून आपली भूमिका प्रदेशाध्यक्षांकडे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनीही काँगे्रस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन आमदार महाडिक यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
विधान परिषदेची कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या वाटणीला असल्याने काँग्रेसंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उमेदवारी कोणाच्या पदरात पडणार हे निश्चित नसले, तरी सतेज पाटील व आमदार महाडिक यांनी प्रचाराची पहिली फेरीही संपविली आहे. पी. एन. पाटील व आमदार महाडिक यांनी सोमवारी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन उमेदवारीवर दावा सांगितला. आजपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलो आहे, कॉग्रेस सोडून आपण कधीच वेगळी भूमिका घेतली नाही.
ज्या ज्या वेळी पक्ष श्रेष्ठींचा आदेश येईल, त्या त्या वेळी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसलाही मदत केलेली आहे. त्यामुळे आपणालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी पी. एन. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या समोर केली. काँग्रेस जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिल्याने कोणतीच अडचण नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
आमदार महाडिक यांनी शिवसेना, भाजपसह इतर पक्षांच्या संख्यांचे गणितच प्रदेशाध्यक्षांसमोर मांडले. विद्यमान आमदार
असल्याने आपल्या नावाचा विचार व्हावा, असेही त्यांनी
सांगितले. प्रकाश आवाडे विदेशात आहेत. त्यांनी फोनवरून आपणही इच्छुक असल्याचे चव्हाण यांना सांगितले.
दरम्यान, मंगळवारी दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. यावेळी जिल्हा निरीक्षक रमेश बागवे, सत्यजित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
खासदार भेटीची चर्चा
खासदार धनंजय महाडिक
यांनी आमदार महाडिक यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने त्याचीही जोरदार चर्चा झाली. महापालिका निवडणुकीत दोघे आमदार असलेले महाडिक भाजप व ताराराणी आघाडीच्या पाठीशी होते.
स्वत: खासदारही राष्ट्रवादीच्या विरोधात रिंगणात असलेल्या ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करत होते. आणि तेच पुन्हा काकांना उमेदवारी द्या म्हणून काँग्रेसच्या प्रदेशाध्यांना भेटण्यात पुढे होते.
‘पी. एन.’ यांनी वाचला पाढा
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केलेल्या कुरघोड्यांचा पाढाच पी. एन. पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर वाचल्याचे समजते. आपल्या आडवे येणाऱ्यांचे कोणी, कसे काटे काढले, याचा सविस्तर अहवालच त्यांनी सादर केल्याचे समजते.
मालोजीराजे, आवळे यांचीही चर्चा
पी. एन. पाटील यांनी फोनवरून मालोजीराजे छत्रपती व माजी खासदार जयवंतराव
आवळे यांचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी संवाद करून दिला. आपण कॉग्रेससोबत असून आपले जे काही नगरसेवक असतील ते पक्षाबरोबरच राहतील. प्रत्यक्ष भेटून
सविस्तर चर्चा करतो, असे मालोजीराजे यांनी स्पष्ट केले. आपण पक्षाशी बांधील राहू असे आवळे यांनीही सांगितले.
विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेसमधील इच्छुकांनी सोमवारी भेट घेतली; परंतु पक्षाच्या निरीक्षकांसमवेत आज, मंगळवारी सर्व इच्छुकांची बैठक होत आहे. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करून उमेदवारीचा निर्णय होईल. खासदार महाडिक यांनीही माझी भेट घेतली.
- अशोक चव्हाण,
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस