महागाई विरोधात काँग्रेसचा थाळी-लाटणे मोर्चा
By admin | Published: October 20, 2015 08:32 PM2015-10-20T20:32:38+5:302015-10-20T20:32:38+5:30
डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने थाळी-लाटणे जोरात वाजवत मोर्चा काढला.
Next
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि.२० - डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने थाळी-लाटणे जोरात वाजवत मोर्चा काढला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. थाळी- लाटणे जोराजोरात वाजवून झोपलेले सरकार जागे करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. निवडणुकीपुर्वी महागाईविरोधात तावातावाने बोलणारे भाजपा नेते मोदींच्या कार्यकाळातील गगनाला भिडणा-या महागाईवर चिडीचूप आहेत. असा सवाल संजय निरुपस यांनी उपस्थित केला.
भाजपा सरकारच्या कालावधीत भारतात डाळींच्या किमती गगनाला भिडत असताना निषेध करणारे भाजपाचे खासदार आता कुठेही दिसत नाही. सध्या भारतात तुरडाळ २०० रुपये किलोने विकली जात आहे. याचवेळी शेजारील पाकिस्तानात ७०, बांगलादेशात ६५, नेपाळ मध्ये ६८, बर्मा येथे ७२, तर श्रीलंकेत ६४ रुपयांने विकली जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महागाईला डायन असे मोदी म्हणायचे आणि आता पंतप्रधान होऊन दीड वर्ष झाले तरी महागाई कमी न होता अधिकच वाढत आहे. याला मोदी, विकास म्हणणार की अच्छे दिन, असा सवाल निरुपम यांनी केला.